आचरा येथे आंब्याचा झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू…

⚡मालवण ता.०५-:
मालवण तालुक्यातील आचरा भंडारवाडी येथील आंबा कलमावर फवारणी करत असताना आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास तीस फुटावरून दगड धोंड्यात कोसळल्याने अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज ( वय ४५ ) रा मालवण भरड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची खबर त्याचा भाऊ लुईस फ्रान्सिस कार्डोज याने आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण भरड येथे राहणारे लुईस फ्रान्सीस कार्डोज हे दहा वर्षापासून आंबा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. आचरा भंडारवाडी येथील आंबा कलम कराराने घेतले होते. शुक्रवारी आचरा येथे पत्नी व भाऊ अँड्र्यू व कामगार असे आंबा झाडावरील फवारणी करण्यासाठी आले होते.

यावेळी अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज हे फवारणी करण्यासाठी उंच असलेल्या आंबा कलमावर चढून फवारणी पूर्ण करून डेरेदार कलमा वरून ते दोरीच्या साहाय्याने खाली उतरत असताना हातातील दोरी सुटल्याने अँड्र्यू कार्डोज हे सुमारे तीस फुटावरून जमिनीवर कोसळले

अँड्र्यू कार्डोज हे झाडाखाली असलेल्या दगडात कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच गतप्राण झाले. या घटनेची माहिती समजताच आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर, मनोज पुजारे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर घाडीगांवकर करत आहेत

You cannot copy content of this page