बांद्यातील कल्पना ट्रेडर्सला मध्यरात्री भीषण आग; पटेल बंधूंचे लाखोंचे नुकसान…

⚡बांदा ता.१२-: बांदा शहरातील दोडामार्ग रस्त्यावरील गडगेवाडी येथे असलेल्या कल्पना ट्रेडर्स या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून पटेल बंधू यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली.
आगीची माहिती मिळताच सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ आणि दोडामार्ग येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत पहाटे सुमारे ५.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुकानात रंगसाहित्य तसेच लाकडी फर्निचर मोठ्या प्रमाणात साठवलेले असल्यामुळे आग झपाट्याने भडकली आणि मोठे नुकसान झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच बांदा परिसरातील शेकडो नागरिक घटनास्थळी धावून आले व मदतकार्य केले. स्थानिकांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मोठी मदत झाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पटेल बंधु यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page