वेंगुर्ला तालुक्यात गवारेड्यांच्या दहशतिने नागरिक भयभीत..
⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे सोमवारी रात्री गवारेड्यानी दोन वाहनाला धडक दिल्याने चारजण जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री मातोंड हायस्कुल नजिक कौस्तुभ सुनील शिंदे रा. मातोंड यांच्या वाहनाला (टेम्पो क्र. MH-07-AJ -1663) धडक दिल्याने वाहनाचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान याबाबत राहुल विश्वनाथ प्रभु यांनी वनविभागाला खबर दिल्यावर वेंगुर्ला वनपाल सावळा कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान बॅक टू बॅक सलग दोन दिवसात गवारेड्यानी वाहनाला धडक दिल्याने ग्रामीण भागातील नागरिक, वाहनधारक, नोकरदार वर्ग तसेच शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वनविभागाने तालुक्यात वनपाल सावळा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित व्यापक स्तरावर जनजागृती विशेष मोहीम हाती घेतली असून नागरिक वाहनधारक यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.
