मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी यांच्या मागणीला यश
*💫सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांना शासनाने एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. डॉ. पाटील यांना मुदतवाढ मिळाल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. या मुदतवाढीची मागणी करणारे माजी शिक्षण आरोग्य सभापती श्री मंगेश तळवणेकर, आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या मागणीला एकप्रकारे यश आले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील हे आज सेवानिवृत्त होणार होते. मात्र जनतेतून डॉ. उत्तम पाटील यांना अजून काही दिवस कायम करण्याबाबत मागणी होत होती. कोरोना सारख्या कठीण कालावधीत डॉ. उत्तम पाटील यांनी चांगले काम केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपजिल्हा रुग्णालय भेटी दरम्यान मंगेश तळवणेकर आणि देव्या सूर्याजी यांनी मुदत वाढीबाबत मागणी केली होती, ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब मान्य केली होती, मात्र यावर आज औपचारिकरित्या शिक्कामोर्तब झाला असून या संबंधीचा जीआर डॉ. पाटील यांना प्राप्त झाला आहे. यानुसार पुढच्या एक वर्षासाठी पाटील यांना मुदतवाढ मिळाली आहे. याबाबत तळवणेकर, सूर्याजी यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.
