एलसीबीची धडाकेबाज कारवाई:गुन्ह्यातील एर्टिगा कार जप्त..
⚡कणकवली ता.०६-: फोंडाघाट (गांगोवाडी) येथील लिंग्रस यांच्या घरात घुसून रॉबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिन्ही आरोपींना सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने अवघ्या पाच दिवसांत मुंबई उपनगरातून जेरबंद केले. ५ डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली असून आरोपींना कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरलेली पिवळ्या नंबर प्लेटची एर्टिगा कारही जप्त करण्यात आली आहे.
पकडलेल्या आरोपींची नावे अशी आहेत – जगदीश श्रीराम यादव (रा. भिवंडी), चनाप्पा साईबाण्णा कांबळे (रा. वागळे इस्टेट, ठाणे) आणि नागेश हनुमंत माने (रा. नेरुळ).
पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एएसआय सुरेश राठोड, हवालदार आशिष गंगावणे व कॉन्स्टेबल कांडर यांचा समावेश होता.
तृप्ती लिंग्रस यांनी ३० नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार अज्ञात इसम सकाळी साडेसातच्या सुमारास घरात घुसले. त्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी तिला बेडवर पाडून तिच्या आईचे तोंड दाबले. मात्र तृप्ती हिने चोरट्याच्या हाताला चावा घेत ‘चोर चोर’ असा आरडाओरड केला. त्यामुळे चोर पळून गेले. पळताना त्यांनी कटावणी, कटर, लोखंडी रॉड आणि एका चोराची चप्पल घरातच टाकली. त्यानंतर ते पिवळ्या नंबर प्लेटच्या एर्टिगा कारमधून फोंडाघाट चेकपोस्टकडे पळाले.
या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात बीएनएस ३३३, ३०९(५), ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला होता. तांत्रिक पुरावे, मिळालेली गोपनीय माहिती आणि शिताफीने केलेल्या तपासातून एलसीबीने तीन आरोपींना पकडून पुढील तपासासाठी कणकवली पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. आरोपींना अटक दाखल करून त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
