वेंगुर्ला पोलिस पथकाची जलद तपास व धडक कामगिरी..

90 लक्ष फसवणूक प्रकरणी दोघा संशयिताना ताब्यात..

⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला शहरातील एका तरुण व्यावसायिक युवकाची 9 लाख 90 हजार रुपयाची आर्थिक फसवणूकीची घटना घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता ते 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वा.या मुदतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडली होती. याबाबत संबंधित युवा व्यावसायिकाने वेंगुर्ला पोलिसात धाव घेऊन दहा दिवसापूर्वी (2 मार्च) फिर्याद दाखल केली होती. याबाबत वेंगुर्ला पोलिसांनी शीघ्रगतीने तपास करीत एका महिलेसह एकूण दोघांना मंगळवारी 10 मार्च रोजी ताब्यात घेतले असून 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान वेंगुर्ला पोलिसांच्या या जलद तपासाबद्दल व धडक कामगिरीबद्दल त्यांचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी की, वेंगुर्ला शहरातील संबंधित युवा व्यावसायिक याला www.stake.com या गेमिंग ॲप्लिकेशन ( ऑनलाईन गेमिंग ) बाबत माहिती देऊन पैसे गुंतवल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल, असे आमीष दाखवून त्याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून त्या ॲप साठी एका महिलेने दिलेल्या YES बँक शाखा डोंबिवली – ईस्ट, खाते क्रमांक 095426900000384, IFSC code YESB0000954, यावर तब्बल 9 लाख 90 हजार रुपये रक्कम RTGS द्वारे भरण्यास सांगून ते घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली होती, अशी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलीस हवालदार योगेश राऊळ, वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, पोलीस हवालदार जयेश सरमळकर व महिला पोलीस अंमलदार गौरी ताम्हणेकर आदीच्या पथकाने एका महिलेस गोवा कलंगुट येथून व एका पुरुषास सावंतवाडी येथून मंगळवारी 10 मार्च रोजी ताब्यात घेतले होते. वेंगुर्ला पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवित गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 8 दिवसात 2 संशयीताना ताब्यात घेतले आहे. दरम्यान वेंगुर्ला तालुक्यात वारंवार अशा घटना घडत असून काही तरुणवर्ग झटपट पैसा मीळविण्याच्या व झटपट श्रीमंतीच्या नादात व्यस्त असून अशा प्रकारे नुकसानग्रस्त होत आहे. त्यामुळे युवकांनी अशा घटनापासून सावध रहावे, असा सूर व्यक्त होत आहे. मागील 5-6 महिन्यात वेंगुर्ला पोलिसांनी अशाच प्रकारे इतर विविध गुन्ह्यातील संशयितांना शिताफिने ताब्यात घेतल्याने त्यांच्या टीमच्या कारवाईचे सिंधुदुर्ग जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page