सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचेही मोठे योगदान…

श्री. मनीष दळवी ; ओरोस येथील क्रिकेट स्पर्धेत
मुख्यालय पत्रकार संघ विजेता – वेंगुर्ला संघ उपविजेता..

⚡ओरोस ता.१२-: आज सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या एका योग्य उंचीवर जात आहे. पत्रकारांचेही जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. आजकाल निरोगी आयुष्यासाठी मैदानी खेळाची गरज भासत आहे. त्यादृष्टीने मुख्यालय पत्रकार जिल्ह्यातील पत्रकारांसाठी करीत असलेले क्रिकेट स्पर्धेचे आयोजन स्तुत्य उपक्रम आहे. यापुढेही आपण सर्वांनी जिल्ह्याच्या विकासासाठी टीमवर्कने काम करूया, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सिंधुदुर्गनगरी येथे बोलताना केले.
पाचव्या वर्षी संपन्न झालेल्या मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत आयोजक मुख्यालय पत्रकार संघ विजेता ठरला. तर वेंगुर्ला पत्रकार संघ उपविजेता ठरला. वेंगुर्ला संघाने सलग तीन सामन्यात दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याहस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेच्या शुभारंभाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी फटकेबाजी करीत सुरुवात केली. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी बॅटिंग करताना दाखविलेला उत्साह उपस्थितांना भारावून टाकणारा होता. यानंतर पहिला सामना मुख्यालय पत्रकार विरुद्ध कुडाळ यांच्यात झाला. या सामन्यात मुख्यालय संघाने विजय मिळविला. दुसरा सामना कणकवली विरुद्ध सावंतवाडी यांच्यात होणार होता. परंतु सावंतवाडी संघ उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे त्यांना पुढील चाल देण्यात आली. त्यानंतर मुख्यालय विरुद्ध कणकवली यांच्यात पहिला उपांत्य सामना रंगला. या सामन्यात सुद्धा मुख्यालय संघाने विजयी बाजी मारली. यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीत विश्रांती घेण्यात आली. दुपारनंतर पहिला सामना इलेक्ट्रॉनिक मिडिया विरुद्ध मालवण पत्रकार या संघात होणार होता. परंतु मालवण संघ उपस्थित राहिला नसल्याने इलेक्ट्रॉनिक मिडिया संघाला पुढील चाल देण्यात आली. त्यानंतर वेंगुर्ला संघ विरुद्ध दोडामार्ग यांच्यात साखळी सामना झाला. यावेळी वेंगुर्ला संघाने बाजी मारली. त्यामुळे वेंगुर्ला संघ विरुद्ध इलेक्ट्रॉनिक यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला. या सामन्यात वेंगुर्ला संघ विजयी झाला. त्यामुळे अंतिम सामना मुख्यालय विरुद्ध वेंगुर्ला यांच्यात झाला. या सामन्याची नाणेफेक जिंकत मुख्यालय संघाने वेंगुर्ला संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले.वेंगुर्ला संघाने पहिल्याच चेंडूवर षटकार मारीत आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे विकेट पडत गेले. परंतु आक्रमक फलंदाजीच्या जोरावर वेंगुर्ला संघाने ५६ धावा केल्या. २४ चेंडू आणि ५७ धावा असे विजयाचे समीकरण घेऊन मैदानात उतरलेल्या मुख्यालय संघाने सावध सुरुवात केली. पहिल्या षटकात केवळ सहाच धावा केल्या. परंतु दुसऱ्या षटकार फलंदाज गिरीश परब याने चार षटकार, एक चौकार आणि दोन धावा अशी आक्रमक फलंदाजी करीत तब्बल ३० धावा घेत सामना मुख्यालय संघाकडे झुकविला. तिसऱ्या शटकात अमित राणे यांनी तीन चौकार मारीत शेवटच्या षटकात सहा चेंडू आणि आठ धावा असे समीकरण ठेवले. चौथ्या षटकातील पहिलाच चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचविण्याच्या नादात अमित राणे झेल बाद झाले. त्यानंतर आलेल्या केतन म्हाडेश्वर याने पहिल्याच चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारीत विजय मिळविला. त्यामुळे मुख्यालय संघ विजेता ठरला. तर वेंगुर्ला संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. सुरुवातीला गतवर्षी उपांत्य सामन्यात पोहोचलेल्या दोडामार्ग संघाला रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर अंतिम सामनावीर म्हणून अमित राणे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार कै. प्रवीण मांजरेकर यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पुरस्काराचे मानकरी प्रसाद पाताडे ठरले. उत्कृष्ट गोलंदाज दत्ता धुरी (वेंगुर्ला) आणि उत्कृष्ट फलंदाज हर्षल परब(वेंगुर्ला ) म्हणून यांचा सत्कार करण्यात आला. तर मालिकावीर म्हणून गिरीश परब यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर यावर्षीचा उपविजेतेपदाचा चषक आणि रोख 5 हजार 555 रुपये वेंगुर्ला संघाला देण्यात आले. तर मुख्यालय पत्रकार संघाला विजेतेपदाचा आकर्षक चषक आणि रोख ७ हजार ७७७ रुपये देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा, सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वितेसाठी वागदे येथील विलसन क्रीडा मंडळाचे मोठे सहकार्य लाभले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मुख्यालय अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, मकरंद परब, संजय वालावलकर, सुहास देसाई, संदीप गावडे यांच्यासह मुख्यालय आणि जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page