Headlines

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी २०९.१० कोटींची मदत जाहीर…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेला यश:दादा साईल यांची पत्रकार परिषदेत माहिती..

कुडाळ : पावसाळी अधिवेशनात कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक आणि अभ्यासू भूमिकेमुळे अखेर राज्य सरकारला तातडीने पावले उचलावी लागली आहेत. आ. राणे यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत शासनाने शासन निर्णय जारी करत कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या भरीव मदतीला मंजुरी दिली आहे. २०१३ नंतर पहिल्यांदाच आंबा-काजू उत्पादकांना अशा प्रकारची मोठी नुकसानभरपाई जाहीर झाली आहे.अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार निलेश राणे यांनी कोकणातील आंबा-काजू बागायतदारांसाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल दादा साईल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दीपक नारकर, काका कुडाळकर, मिलिंद नाईक, प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, अरविंद करलकर, रेवती राणे, स्वरूप वाळके, विजय जाधव,सचिन साईल, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.
​दादा साईल म्हणाले, ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे कोकणातील बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून इनपुट सबसिडी स्वरूपात मदत दिली जाणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार प्रती हेक्टर २२,५०० रुपये दराने ही मदत थेट डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
​या महत्त्वपूर्ण निर्णयाचा लाभ कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना होणार आहे. एकूण ९२ हजार ३४२.७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान यासाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक निधी पुढीलप्रमाणे विभागून देण्यात आला आहे: ​रत्नागिरी जिल्हा: ९८.४४ कोटी रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्हा: ७९.०५ कोटी रुपये. ही मदत शासनाकडून थेट दिली जात असून, यामध्ये विमा कंपन्यांची रक्कम समाविष्ट नाही. विमा कंपन्यांची रक्कम दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
श्री. साईल पुढे म्हणाले, ​गुरुवारी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी कोकणातील बागायतदारांची प्रत्यक्ष स्थिती आणि कृषी विद्यापीठांनी केलेले सर्व्हे यावर अभ्यासपूर्ण आणि बेधडक शैलीत वस्तुस्थिती मांडली. त्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना धारेवर धरत तातडीने मदतीची मागणी केली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळेच प्रशासनाने अवघ्या काही तासांत मदतीचा आद्यादेश जारी केला.
आ. निलेश राणे यांनी गुरुवारी कोकणातील बागायतदार, शेतकऱ्यांची समस्य अभ्यासपूर्ण, आक्रमक व बेधडक शैलीत मांडत सभागृह हलवून सोडले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना धारेवर धरत छापील माहिती आणि बागायतदारांची प्रत्यक्ष स्थिती, कृषी विद्यापिठ्ने केलेला सर्वे अशा वेगवेगळ्या मुद्यांवर वस्तुस्थिती मांडली. आ. निलेश राणे यांच्या अभ्यासू पद्धतीने मांडलेल्या विषयामुळे अखेरीस अवघ्या काही तासात शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली.
​खासदार नारायणराव राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोकणच्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण झाला असून, संपूर्ण कोकणातून आमदार निलेश राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तराय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत, असे दादा साईल यांनी शेवटी सांगितले.

You cannot copy content of this page