⚡मालवण ता.१२-:
गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मालवण शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्यावतीने शुक्रवार दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
हिंदू संस्कृतीतील गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मानला जाणारा सण असून या दिवशी नववर्षाची सुरुवात
होते. या पार्श्वभूमीवर मालवणात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक चित्ररथ, घोडे, कोल्हापूर येथील पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, विविध देखावे तसेच शिमगोत्सवाचा भव्य कार्यक्रम सादर केला जाणार आहे. ही यात्रा दत्त मंदिर, भरड बाजारपेठमार्गे फोवकांडा पिंपळ, मालवण या मार्गाने काढण्यात येणार आहे.
यात्रेत महिला, पुरुष, युवक-युवती तसेच विविध सामाजिक संस्था आणि विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. यावेळी बालगट, महिला गट आणि पुरुष गट अशा विभागात ऐतिहासिक, पौराणिक आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
तसेच करवीर-कोल्हापूर येथील मर्दानी खेळ श्रीमंत योगी मर्दानी आखाडा यांच्यामार्फत घोडे, चित्ररथ आणि शिमगोत्सवाचा भव्यदिव्य कार्यक्रम, कै. आना मेस्त्री ग्रुप, नेरुर यांचे विशेष प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत फाटक ९४२१०४६३९०, बंटी केनवडेकर, अमिता निवेकर यांच्याशी संपर्क साधावा. मालवण शहरातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे संयोजक अमित खोत यांनी केले आहे.
