Headlines

….अन्यथा बीएलओचे काम बंद ठेवणार

प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन:२५ संघटना व पदाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग ; कारवाईची केली मागणी..

⚡कणकवली ता.२९-: देवगड येथे २५ जून रोजी झालेल्या बीएलओ व एसआयआर प्रशिक्षणादरम्यान प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कर्मचाऱ्यांशी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाच्या निषेधार्थ सोमवारी कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईपर्यंत बीएलओचे काम न करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. जिल्ह्यातील विविध कर्मचारी, शिक्षक आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुमारे २५ संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर यांनी सांगितले की, देवगड येथे झालेल्या प्रशिक्षणासाठी सुमारे ३०० ते ३५० कर्मचारी उपस्थित होते. अनेक शिक्षक पहाटे घरातून निघून शाळेची कामे पूर्ण करून प्रशिक्षणासाठी आले होते. प्रशिक्षण दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू असतानाही कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती, असा आरोप त्यांनी केला.

प्रशिक्षणादरम्यान शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना शॉर्ट ब्रेक देण्याची विनंती केली असता त्यांना जा तुम्ही जा असे सांगण्यात आले. त्यानंतर इकडे ये, तुला सस्पेंड करतो अशा शब्दांत त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोपही राजन कोरगावकर यांनी केला. कर्मचाऱ्यांचा सन्मान राखण्याऐवजी त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांची दिशाभूल, अन्यायकारक वागणूक आणि कायदेशीर अधिकारांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून त्यांच्या वर्तनाची निष्पक्ष चौकशी करावी तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शांततापूर्ण आंदोलन, निवेदने, तक्रारी तसेच इतर वैधानिक मार्गांचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी समन्वय समितीने दिला. कारवाई न झाल्यास बीएलओचे काम बंद ठेवण्याचा निर्धारही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

सायंकाळी शिवसेना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून हे प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनात राज्य सरकारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्यस्तरीय पदाधिकारी सखाराम सकपाळ, राजन वालावलकर, उदय शिंदे, सयाजी पाटील, भाई चव्हाण, विठ्ठल गवस, म. ल. देसाई, संजय वेतुरेकर, संदीप कदम, वामन तर्फे, नंदकुमार राणे, निकिता ठाकूर यांच्यासह विविध २५ संघटनांचे पदाधिकारी आणि जिल्हाभरातील मोठ्या संख्येने शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page