आरोग्य सुविधा पुरवण्यासह गावात करत आहेत जनजागृती*
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ग्रामीण भागात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असल्याने तालुक्यातील असरोंडी गावचे लिंगेश्वर पावणादेवी असरोंडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी कोरोना कालावधीत असरोंडी गावात कोरानाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य सुविधा पुरवत आपली जबाबदारी कणखरपणे पेलली आहे. मंडळातर्फे असरोंडी गावाला ऑक्सीजन सिलेंडर व इतर साहित्य देण्यात आले असून घरोघरी तसेच सड्यावरील खाण कामगार वस्त्यांवर जाऊन तेथील कामगारांची आरोग्य तपासणी व इतर मार्गदर्शन करून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत. असरोंडी येथील मुंबईस्थित असणाऱ्या काही ग्रामस्थांनी एकत्र येत गावासाठी आरोग्य सुविधा पुरवल्या आहेत. श्री लिंगेश्वर पावणादेवी असरोंडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष जयसिंग रत्नोजी सावंत यांच्या सहकार्याने गावचे सुपुत्र, सायन हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. अजित सावंत व भाभा हॉस्पिटलचेचे तज्ञ डॉ. वासुदेव तांबे, मुंबई मंडळाचे खजिनदार सुनिल अंकुश सावंत तसेच कार्यकर्ते प्रकाश सावंत यांनी कोरोनाच्या काळात घ्यावयाची काळजी व खबरदारी याबद्दल सर्व ग्रामस्थांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. सलग दोन दिवसाच्या मार्गदर्शनासह ऋषिकेश नेमिनाथ सावंत यांनी अत्यावश्यक सेवेसाठी लागणारे चार ऑक्सिजन सिलिंडर व त्यासाठी लागणारे सर्व साहित्य, बी.पी. अॕपार्टस २, ग्लुको चेक १, हँड ग्लोज १ बॉक्स, सॅनिटायझर २ कॅन, मास्क एन 95- १०० नग, डिस्पोजेबल मास्क २०० नग ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी गावासाठी वारंवार विविध प्रकारच्या योजना तसेच इतर उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले. या आरोग्य उपक्रमात असरोंडी सरपंच स्नेहल सावंत, उपसरपंच मकरंद राणे, प्रकाश सावंत दशरथ परब, प्रदिप सावंत, संतोष महाजन, संजय सावंत, दिलीप घाडीगावकर, दत्ताराम गावडे व अन्य मान्यवर तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी मंडळाचे व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. फोटो : असरोंडी ग्रामस्थांना ऑक्सिजन सिलिंडर व आरोग्य किट सुपूर्द करताना लिंगेश्वर पावणादेवी असरोंडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी.
