⚡मालवण ता.०६-:
महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मसुरे येथील भरतगड किल्ल्याला भेट देणार आहेत.
मसुरे येथील भरतगड किल्ल्याला मोठा इतिहास आहे. हा गाव आणि येथील परिसर निसर्गरम्य आणि विविधतेने नटलेला आहे. मसुरे गावात पर्यटनास मोठा वाव आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला, धार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रक्रिया लवकरच सुरू केली जातील या दृष्टीने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या सांस्कृतिक वारसा जपण्यात यावा यासाठी मालवण येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी मंत्री शेलार यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मसुरे येथील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मालवण भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले आहे.
