देवली येथील पारंपारिक ‘कनो घालणे’ स्पर्धेत आर्या मेस्त्री प्रथम…

⚡मालवण ता.१३-:
मालवण तालुक्यातील वरची देवली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून ऊर्जा महिला मंडळ, वरची देवली आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पारंपारिक ‘कनो घालणे’ स्पर्धेत आर्या शामसुंदर मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकावला.

वरची देवली येथील सौ. प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी ही स्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमाला इतिहास अभ्यासक डॉ. ज्योती बुवा तोरसकर, देवलीचे सरपंच श्याम वाक्कर, बॅ.नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, ऊर्जा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुमेधा नाईक, मुंबईतील किंग जॉर्ज स्कूलच्या निवृत्त शिक्षिका ममता पालव, परीक्षक नगरसेविका मेघा सावंत आणि वैष्णवी आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविकात ‘कनो घालणे’ ही परंपरेचा अमूल्य ठेवा जपणारी पारंपारिक कला असल्याचे सांगत या कलेला प्रोत्साहन मिळावे तसेच गावातील महिला व मुलींना आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली.

या स्पर्धेत ३९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये कु. आर्या शामसुंदर मेस्त्री हिने प्रथम क्रमांक, सौ. दीक्षा दीपक देऊलकर यांनी द्वितीय तर संजना संभाजी आचरेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तनश्री तुषार चव्हाण आणि दर्शना दत्तात्रय चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्या तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू, पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण नगरसेविका मेघा सावंत आणि वैष्णवी आचरेकर यांनी केले.

यावेळी मालवणच्या नगरसेविका महानंदा खानोलकर, पूनम चव्हाण, अन्वेषा आचरेकर, सुदर्शन नाईक, मृण्मयी खोबरेकर, सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, सोनाली कोळंबकर, तेजस्विनी पाताडे तसेच देवली ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुरा गोवेकर यांनी केले, तर आभार लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया नरेश चव्हाण, तनश्री तुषार चव्हाण आणि अभिलाषा अशोक चव्हाण, प्रणय मेस्त्री यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page