⚡मालवण ता.१३-:
सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे वारणा नदीत पोहताना एका पर्यटकाची नदीत पडलेली सोन्याची मालवण मधील स्कुबा डायव्हर वैभव खोबरेकर व सुजित मोंडकर यांनी नदीत शोधमोहीम राबवत शोधून काढली. चैन परत मिळाल्याने त्या पर्यटकांनी खोबरेकर व मोंडकर यांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
पनवेल येथील काही मित्रांचा ग्रुप सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे फिरण्यासाठी आला होता. हे पर्यटक मित्र त्या परिसरातील वारणा नदीवर पोहण्यासाठी गेले असताना त्या त्यामधील एका तरुणाची अंदाजे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन नदीपात्रात पडली. सोन्याची चैन शोधण्यासाठी त्यांनी मालवण येथील स्कुबा डायव्हर वैभव खोबरेकर व सुजीत मोंडकर यांच्याशी संपर्क साधला. खोबरेकर व मोंडकर या दोघांनी सांगली जिल्ह्यात जाऊन वारणा नदीपात्रात स्कुबा डायविंग करत शोधमोहीम राबवली आणि पडलेली सोन्याची चैन शोधण्यात यश मिळवले. मिळालेली सोन्याची चैन त्यांनी त्या तरुणाकडे सुपूर्द केली. खोबरेकर व मोंडकर यांच्या या धाडसी व प्रामाणिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
