मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराचा जानेवारीत २१ वां वर्धापन दिन सोहळा…

⚡मालवण ता.०६-:
मालवण मेढा येथील ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन सोहळा दि. १९, २० व २१ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार आहे. यनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जय गणेश मंदिर देवस्थान तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मालवण येथील चिवला बीच हॉटेल मध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी जय गणेश मंदिर देवस्थान तर्फे श्री. संजय शिंदे, श्री. प्रकाश कुशे, श्री. भालचंद्र केळूसकर, श्री. शैलेश लुडबे यांनी उपस्थित राहून वर्धापन दिन सोहळ्याविषयी माहिती दिली.

२००५ साली ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी मेढा येथील आपल्या घराच्या जागेत श्री गणेशाचे मंदिर उभारले. या मंदिरात पंचधातूपासून बनविलेल्या आणि त्यावर सोने चढविलेल्या श्री गणेश आणि रिद्धी, सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिर उभारणीनंतर मालवणचां कायापालट होईल असे भाकीत जयंत साळगावकर यांनी त्यावेळी केले होते. आज हे भाकीत खरे ठरले असून जय गणेश मंदिर पर्यटन दृष्ट्या मोठे आकर्षण ठरले असून भारतभरातून पर्यटक या मंदिराला भेट देतात. या मंदिराचा २१ वा वर्धापन दिन सोहळा जानेवारी २०२६ मध्ये साजरा करण्यात येणार आहे. श्री गणेशाच्या दृष्टीने २१ या आकड्याला मोठे महत्व असल्याने २१ वा वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. जयंत साळगावकर यांचे सुपुत्र जयेंद्र साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

यानिमित्त दि. १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ ते ५.३० वाजता नांदी व सुश्राव्य गायन, संध्याकाळी ५.३० ते रात्रौ ८ वा. गणेश आरती स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा मालवण तालुक्यातील शाळांसाठी असून पहिला गट- इयत्ता ५वी ते ७ वी, दुसरा गट- इयत्ता ८ वी ते १० वी असे गट आहेत. प्रथम येणाऱ्या १० स्पर्धक संघाना सहभाग मिळेल, एका संघात सहभागी स्पर्धक संख्या किमान ५ व कमाल ८ असेल, कोणत्याही एका आरतीचे सादरीकरण करावे, पारंपारिक वाद्यांची संगीत साथ असेल-पेटी, पखवाज, टाळ व आरतीची चाल सिनेसंगीतवर किंवा तत्सम नसावी. या स्पर्धेसाठी
पहिल्या गटात प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रु.३०००, रु.२०००, रु.१००० तसेच उत्तेजनार्थ प्रथम- रु. ५००, द्वितीय रु. ५००, दुसऱ्या गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. ५०००, रु. रु. ३०००, रु. २०००, उत्तेजनार्थ प्रथम- रु. १०००, द्वितीय रु. १००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वा. गणेश आरती स्पर्धेतील खुल्या गटाची स्पर्धा होणार असून यामध्ये २० वर्षे वयांवरील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. या गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ७०००, रु. ५०००, रु. ३०००, उत्तेजनार्थ प्रथम – १५००, द्वितीय – १५००, अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर रात्री ९ वाजता दशावतारी नाटक सादर होणार आहे.

दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी मालवण शहर मर्यादित महिलांसाठी उकडीचे मोदक स्पर्धा होणार असून प्रथम येणाऱ्या १५ महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्पर्धक महिलेने २१ मोदकांचे ताट सादर करावयाचे आहे. परीक्षकांच्या चवीसाठी पाच मोदक ज्यादा आणावेत. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना प्रत्येकी रुपये १५०० रु. पारितोषिक दिले जाईल. तर रात्री प्रसिद्ध दशावतार कलाकार नितीन आशयेकर यांच्या देवी भूमिका दशावतार लोकनाट्य कला मंडळ यांचा बाळूमामा यांच्यावर आधारित दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तर दि. २२ जानेवारी रोजी खुल्या गटाची अभंग स्पर्धा होणार असून १५ संघांना प्रवेश देण्यात येईल, तसेच विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १५०० आणि उत्तेजनार्थ तीन बक्षिसे रु. १००० अशी पारितोषिके देण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तरी सर्वांनी या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी व्हावे, स्पर्धकांनी स्पर्धामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

You cannot copy content of this page