⚡बांदा ता.०६-: मडूरा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवातील पालक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडल्या. शाळेच्या आवारात सकाळपासूनच पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती, रंगीत सजावट आणि क्रीडांगणातील जोश या सर्वामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षक रूप लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीती साळगावकर यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मंगल कामत, कोकण रेल्वेचे तिकीट तपासणी अधिकारी तानाजी गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रकाश वालावलकर, सुरेश गावडे, पालक प्रतिनिधी सौ. श्रावणी परब उपस्थित होत्या.
श्रीमती कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाला औपचारिक सुरुवात झाली.
लहानग्या विद्यार्थ्यांसाठी विविध आकर्षक सादरीकरणे आयोजित करण्यात आली होती. नर्सरी, जूनियर आणि सीनियर वर्गातील मुलांनी दिलखेचक पॉम पॉम ड्रिल सादर केली. येलो व ब्लू गटातील विद्यार्थ्यांनी तालबद्ध क्लॅपिंग ड्रिल, तर रेड व ग्रीन गटातील विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी ओढणी ड्रिल सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
श्रीमती कामत म्हणाल्या “पालकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन ही अत्यंत स्तुत्य कल्पना आहे. पुन्हा एकदा बालपणात रमण्याची आणि खेळाडू वृत्ती अनुभवण्याची संधी शाळेने पालकांना दिली आहे. सर्वांनी याचा मनापासून आनंद घ्या.”
कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. शाळेच्या क्रीडा शिक्षिका सौ. मयुरी कासार, हर्षदा तळवणेकर, सहशिक्षिका सौ. वेलंकनी रॉड्रिक्स, सौ. स्वरा राठवड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
फोटो:-
मडुरा येथे नाबर प्रशालेत आयोजित पालक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून करताना मान्यवर.
मडुरा येथील नाबर स्कूलमध्ये पालक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न…
