कणकवली : कणकवली तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या बैठकीत कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत सकाळी ७.३० वाजता एस.टी. वर्कशॉपजवळील श्री गणेश मंदिर येथे अभिषेक करण्यात येणार असून त्याचे आयोजन सुनील पारकर यांनी केले आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी बाळू पारकर, रवींद्र नवाळे, प्रदीप तळगावकर आणि सुनील सावंत हे करत आहेत.
तसेच सकाळी ११ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात येणार असून हा कार्यक्रम प्रिया टेंबकर आणि अक्षता राणे (पं. स. सदस्य ) यांच्या पुढाकाराने होणार आहे. दुपारी १२ वाजता असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शरद वायंगणकर आणि रुहिता तांबे ( जि. प. सदस्य ) हे या उपक्रमाचे नियोजन करत आहेत.
दरम्यान, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुहिता तांबे, पंचायत समिती सदस्य अक्षता राणे, पं. स. सदस्य गुरु शिंदे तसेच कणकवली नगरपंचायत नगरसेवक सत्यजित पारकर यांचा अभिनंदन ठरावही बैठकीत घेण्यात आला. तालुक्यातील सभापती व उपसभापती यांच्या निवडीबद्दलही अभिनंदन व्यक्त करण्यात आले.
ही माहिती शिवसेना सिंधुदुर्गचे उपजिल्हाप्रमुख शरद वायंगणकर आणि कणकवली तालुकाप्रमुख दामू सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
