नगराध्यक्ष संदेश पारकर:कणकवली शहरातील क्रीडा संकुलाची केली पहाणी!..
⚡कणकवली ता.१३-: शहरातील क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विविध मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील आवश्यक सुविधा, स्वच्छता तसेच करण्यात येणाऱ्या सुधारणा याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
भविष्यात या ठिकाणी लहान मुलांपासून तर युवकांसह ज्येष्ठ नागरिकही विरंगुळा आणि व्यायामासाठी येणार असल्याने क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. येथील स्विमिंग पूलचा उपयोग भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी होईल, या दृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले.
क्रीडा संकुल परिसरातील स्वच्छतागृह हे अतिशय मोक्याच्या ठिकाणी असल्याने नागरिकांना त्याचा सहज वापर करता येईल. त्यामुळे स्वच्छतागृहांची योग्य प्रकारे स्वच्छता करून ती लवकरात लवकर वापरासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना नगराध्यक्ष पारकर यांनी केली.
यावेळी विहीर स्वच्छ करणे, ड्रेनेजची दुरुस्ती करणे, मुख्य गेट सुस्थितीत आणणे, स्वच्छतागृहांची साफसफाई करून पाण्याची व्यवस्था करणे, रंगकाम तसेच प्लंबिंगची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह नगरसेवक संकेत नाईक, सुमेधा अंधारी, सुनील पारकर, सुजित जाधव, वैभव मालंडकर, सौरभ पारकर, चेतन अंधारी, बांधकाम अभियंता विभव करंदीकर, नगरपंचायत कर्मचारी रवींद्र म्हाडेश्वर, प्रकाश राठोड, स्थापत्य अभियंता सचिन नेरकर, उमेश आरोलकर आदी उपस्थित होते.
