बांदा पोलिसांची मोठी कामगिरी; घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक…

बांदा/प्रतिनिधी
बांदा पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या रोणापाल येथील दिवसाढवळ्या घरफोडी प्रकरणातील आरोपीचा शोध लागला असून त्याला अटक करण्यात यश आले आहे. अजय अर्जुन गावडे (वय 27, रा. रोणापाल, भरडवाडी, ता. सावंतवाडी) हा सदर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दिली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील पडताळणी, संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत प्रभावी तपास सुरू ठेवला. त्यादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा मिळवत ५ डिसेंबर २०२५ रोजी त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर झालेल्या पुढील चौकशीत आरोपीकडून ३० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ६.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ऐवज पोलिसांनी हस्तगत करण्यास यश मिळवले आहे.
आठ दिवसांपूर्वी हि घरफोडीची घटना घडली होती. प्राथमिक तपासात पोलिसांना अजय गावडे याच्यावर संशय होता. पोलिसांनी कसून तपास केला असता चोरीच्या घटनेत त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपासामध्ये आणखी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हि संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवस, तात्या कोळेकर, पोलीस हवालदार राजेश गवस, सिद्धार्थ माळकर, राजू कापसे, श्री पालकर, तसेच महिला हवालदार संगीता वरक यांच्या टीमने केली आहे. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे दिवसाढवळ्या घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा अल्पावधीत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

You cannot copy content of this page