⚡सावंतवाडी ता.२२-: आरोंदा भटपावणी येथील वीज समस्यांबाबत तसेच स्मार्ट मीटर जोडणीबाबत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत ग्रामस्थांनी वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज समस्यांबाबत ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले .
यावेळीआबा केरकर, भगवान नाईक, निवृत्ती नाईक, परशुराम नाईक,रुपेश नाईक,दशरथ नाईक,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी वीज जोडणीवर स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रस्तावाबाबत माहिती देण्यात यावी तसेच ग्रामस्थांच्या हरकती विचारात घ्याव्यात, अशी मागणी आरोंदा-भटपावणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) च्या संबंधित उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
गावातील वीज ग्राहकांच्या जोडण्यांवर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या मीटरची कार्यपद्धती, बिल आकारणीची पद्धत, रिचार्ज प्रणाली, ग्राहकांवर होणारा आर्थिक परिणाम तसेच तांत्रिक बाबींबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात स्वीकारण्यात याव्यात आणि त्या विचारात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या विषयावर जनजागृती सभा घेण्याची तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात येऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
