सीआरएस पोर्टलच्या कारणाने विलंबमाजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची प्रशासनाकडे तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी..
⚡सावंतवाडी ता.२२-: गेल्या पंधरा दिवसांपासून जन्म नोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सीआरएस (Civil Registration System) पोर्टल अपडेट करण्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जात असून, यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
जन्म नोंद दाखला हा प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा अधिकार असून शाळा, महाविद्यालयीन प्रवेश, पासपोर्ट तसेच आधारकार्डसह विविध शासकीय कामांसाठी त्याची आवश्यकता असते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून दाखले मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, संपूर्ण महाराष्ट्रातील सीआरएस पोर्टल अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. पोर्टल अपडेट करणे आवश्यक असले तरी शाळा व महाविद्यालये सुरू होत असताना नागरिकांना तातडीने दाखले मिळणे गरजेचे असल्याचे साळगावकर यांनी म्हटले आहे.
“ज्यांच्या जन्म नोंदी उपलब्ध आहेत, त्यांचे दाखले दोन्ही रजिस्टर तपासून लेखी स्वरूपात देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी. पूर्वी रजिस्टर तपासून दाखले देण्याची पद्धत होती, त्याच पद्धतीचा अवलंब करून नागरिकांची गैरसोय दूर करावी,” अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
शासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
