Headlines

आजगाव मायनिंग स्थगितीची जबाबदारी पालकमंत्र्यांचीच…

रूपेश राऊळ:ड्रोन सर्वेक्षणाला दिलेली मंजुरी रद्द करा..

⚡सावंतवाडी ता. १९-:
आजगाव येथील मंदिरात जाऊन “मी पालकमंत्री असेपर्यंत आजगावसह ११ गावांमध्ये मायनिंग प्रकल्प होणार नाही” असा निर्वाळा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. मात्र, प्रशासनाने ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला दिलेल्या मंजुरीला स्थगिती देण्याची खरी जबाबदारी आता पालकमंत्र्यांचीच असल्याचे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केले आहे.
राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून पालकमंत्री नितेश राणे तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. आजगावसह ११ गावांतील ग्रामस्थांच्या प्रश्नावर पालकमंत्री मंदिरात येऊन आश्वासन देत असताना, चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले दीपक केसरकर मात्र ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
“आमदार सक्षमपणे ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहिले असते तर पालकमंत्र्यांना आजगावात येण्याची गरज पडली नसती. मात्र, मतदारांना वाऱ्यावर सोडल्याची भावना नागरिकांच्या मनात आहे,” असे राऊळ यांनी म्हटले आहे.
ड्रोन सर्वेक्षणाला स्थगिती द्या
आजगावसह परिसरातील ११ गावांमध्ये मायनिंग प्रकल्प होणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर आता प्रशासनाने ड्रोन सर्वेक्षणासाठी दिलेली मंजुरी तातडीने स्थगित करण्याची गरज आहे. केवळ आश्वासन न देता शासन स्तरावर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी राऊळ यांनी केली आहे.
सातार्डा खाणकामावरून सवाल
दरवर्षी होणाऱ्या अवैध उत्खननामुळे डोंगर कोसळण्याच्या घटना घडत असून स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे राऊळ यांनी सांगितले. सातार्डा येथील डेक्कन मिनरल्स प्रा. लि. कंपनीच्या खाणकामाचा संदर्भ देत त्यांनी उत्खननाबाबत प्रश्न उपस्थित केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ४०.३७ हेक्टर क्षेत्रासाठी उत्खननाची परवानगी असताना शेजारील ५२.२२ हेक्टर आणि २०.२६ हेक्टर क्षेत्रात परवानगीशिवाय उत्खनन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यातील २०.२६ हेक्टर क्षेत्रातील खाण कोसळूनही प्रशासनाने ठोस कारवाई केल्याचे जाहीर केले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
आडाळी एमआयडीसीतील उत्खननावरही टीका
आडाळी एमआयडीसी परिसरातील सरकारी जमिनीवर मायनिंगसदृश माती उत्खनन झाल्याचा आरोप करत राऊळ यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारी जमिनीवरील या प्रकाराची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांचे पालकत्व स्वीकारण्याची भूमिका घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी आडाळी एमआयडीसीतील उत्खननाचे सत्य समोर आणावे. अन्यथा प्रत्येक प्रश्नासाठी ग्रामस्थांना मंदिरात बोलवावे लागणार का?” असा सवाल रूपेश राऊळ यांनी केला आहे.

You cannot copy content of this page