पालकमंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद..
⚡कणकवली ता.१५-: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी आज शाळांचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कलमठ कुंभारवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी चॉकलेट, वह्या, पुस्तके आणि गणवेशाचे वितरण करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थ्यांशी वन-टू-वन संवाद साधत त्यांच्या शिक्षणाविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना मन लावून शिक्षण घेण्याचा सल्ला देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, निसार शेख, पंचायत समिती सदस्य गुरू वर्देकर, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
दरम्यान, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण करण्याचा तसेच शाळेत आनंदी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वागत समारंभ, मोफत पाठ्यपुस्तक वितरण आणि गणवेश वितरण सोहळ्याने हा प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरला.
