परशुराम उपरकर:महिलांना दीड हजार देऊन आता महागाई करत लूट चालू; राज्यात ५१ लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र..
⚡कणकवली ता.१०-: महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना १५०० रुपये देऊन लाडकी बहीण योजना आणली. आता कार्यवाही करताना ५१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. तसेच २१ हजार शासकीय आणि निमशासकीय महिलांनी लाभ घेतले. २६ हजार पुरुष लाभार्थी आढळले आहेत. त्यांची आता वसुली होणार आहे. महिलांना दीड हजार देऊन महागाई करत लूट चालू आहे. महायुती सरकारने महागाईच्या खाईत लोटले असल्याचा आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात जो काळा पैसा वाटायचा होता तो लाडकी बहीण योजना आणून व्हाईट पैसे वाटले. त्यामुळे महिलांची मते वळवली. आता त्यांना महागाईची झळ पोहोचत आहे. घरगुती गॅस सिलिंडर दरात वाढ झाली आहे. कडधान्य, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांचे बजेट कोलमडून अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आता शाळा सुरू झाल्यामुळे मुलांसाठी वह्या, ड्रेससह इतर साहित्याचा खर्च वाढला आहे. एका बाजूने महिलांना १५०० रुपये देऊन दुसऱ्या बाजूला महागाईतून महिलांकडून त्यापेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे. सोने दीड लाख रुपये आणि चांदी अडीच लाख रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. राज्यात महागाई निर्माण झाली आहे. महागाईमुळे जनतेची क्रयशक्ती कमी झाली असून नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
जनता आता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. त्यामुळे केवळ पैसे वाटप करण्यापेक्षा महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत श्री. उपरकर यांनी व्यक्त केले. सरकार जनतेला शासकीय सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान खालावत चालले आहे. सरकार गरीबांना गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे धोरण राबवत असल्याचा आरोपही श्री. उपरकर यांनी केला.
