प्लास्टिकमुक्त कलमठसाठी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम…

१ किलो प्लास्टिक जमा करा, २ किलो साखर मिळवा; सरपंचांच्या मानधनातून खर्च..

⚡कणकवली ता.१०-: गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कलमठ ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी आपल्या घरात प्लास्टिक पिशव्या येणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

घरात साचलेले प्लास्टिक गोळा करून ग्रामपंचायतीकडे जमा करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहे. १ किलो प्लास्टिक जमा करणाऱ्याला बक्षीस म्हणून २ किलो साखर देण्यात येणार असून त्याचा खर्च सरपंचांच्या मानधनातून केला जाणार आहे, अशी माहिती सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.

दरम्यान, गावात प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरू असून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाईही करण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षक गणेश सावंत यांनी ही कारवाई केली.

स्वच्छ कलमठ संकल्प ही प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले आहे.

तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ संकुल स्पर्धेचे बक्षीस वितरणही लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे गावातील सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत होणार असून या नावीन्यपूर्ण निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत व कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page