ऍड. संग्राम देसाई यांचे कुडाळ रेल्वेस्थानकावर जल्लोषी स्वागत…

ऍड. देसाई यांचे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत यश:वकील आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानने दिल्या शुभेच्छा..

⚡कुडाळ ता.१०-: महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि नामवंत विधीज्ञ ॲड. संग्राम देसाई यांनी सलग दुसऱ्यांदा घवघवीत विजय संपादन केला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांचे प्रथमच जिल्ह्यात आगमन झाले असून, या निमित्ताने आज सकाळी कुडाळ रेल्वे स्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे हितचिंतक मित्र वकिल नागरीक मोठ्या संख्येने दाखलं झाले आणि जल्लोषी स्वागत केले. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि जिल्ह्यातील वकिलांनी एकत्र येत त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.
​याप्रसंगी कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ॲड. संग्राम देसाई हे केवळ वकिली क्षेत्रातीलच नव्हे, तर आपल्या समाजाचे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खंबीर मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन मोठ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बार कौन्सिलवर सलग दुसऱ्यांदा निवडून येणे ही अत्यंत मोठी आणि अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या विजयाने कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
​ स्वागताने भारावून गेलेल्या ॲड. संग्राम देसाई यांनी सर्वांचे हात जोडून आभार मानले. उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, हा विजय माझा एकट्याचा नसून मला अहोरात्र साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी वकिलांचा, हितचिंतकांचा आणि मला नेहमीच ऊर्जा देणाऱ्या माझ्या सिंधुदुर्गवासीयांचा आहे. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवणे, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देणे या कामांना माझे सर्वोच्च प्राधान्य राहील, तसेच जनतेने आणि सहकाऱ्यांनी दाखवलेला हा विश्वास मी कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ​या स्वागत सोहळ्याला केवळ प्रतिष्ठानचे कार्यकर्तेच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय, कुडाळ, कणकवली व सावंतवाडी येथील वकील संघटनेचे अनेक वरिष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही रेल्वे स्थानकावर येऊन ॲड. देसाई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page