एकाच रात्री सहा बंद घरांवर घरफोडीचा प्रयत्न…

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील नडगीवे येथील धुरीभाटले वाडीमध्ये एकाच रात्री तब्बल सहा बंद घरांवर अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या वाडीत अनेक कुटुंबे नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास असल्याने त्यांची घरे बंद असतात. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चोरट्यांनी परिसरातील सहा घरांचे दरवाजे, गेट व खिडक्यांचे कोयंडे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. काही घरांतील कपाटे उघडण्याचाही प्रयत्न करण्यात आला असून घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे आढळून आले आहे. मात्र नेमकी कोणती मालमत्ता चोरीला गेली आहे, याबाबत घरमालक आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पाटील जितेंद्र मणयार यांनी खारेपाटण पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी व पंचनामा केला.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात ग्लोव्हज घातलेले सुमारे सहा संशयित मध्यरात्री परिसरात फिरताना दिसत आहेत. त्यांच्या ताब्यात दुचाकी वाहनेही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही संघटित चोरट्यांची टोळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे नडगीवे व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बंद घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी संशयितांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खारेपाटण व कणकवली पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page