*मंदार केणी यांनी दत्ता सामंत यांच्यावर केलेली टीका हास्यास्पद

पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांचा पलटवार*

मालवण दि प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत रडीचा डाव खेळून शिवसेनेने दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. अन्यथा त्याचवेळी आमदार वैभव नाईक यांचा पराभव निश्चित होता. आजही आमदार नाईक यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन दत्ता सामंत यांच्या विरोधात जिंकून दाखवावे त्यानंतरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हेकुई करावी. शिवसैनिकांना डावलून स्वतः पदे घेऊन स्वार्थ साधणाऱ्या मंदार केणी यांनी दत्ता सामंत यांच्यावर टीका करणे हे हास्यास्पदच म्हणावे लागेल असा पलटवार पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी शिवसेनेवर केला आहे. मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी यांनी भाजप नेते दत्ता सामंत यांच्यावर केलेल्या टीकेला सुनील घाडीगांवकर यांनी आज रोखठोक प्रत्युत्तर दिले प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात घाडीगांवकर यांनी म्हटले आहे की, आमचे नेते नारायण राणे यांनी मंदार केणी यांना तालुकाध्यक्ष पद दिले होते त्यावेळी त्यांनी काय दिवे लावले व आता शिवसेनेत प्रवेश करून स्वतःचा स्वार्थ कसा साधत आहेत. निष्ठावान शिवसैनिकाना बाजूला सारत आपल्या पदरात पदे घेऊन केवळ आमदार, खासदारांना खुश ठेवण्याचे एकमेव काम मंदार केणी दिवसभर करीत असून शिवसेना प्रवेशावेळी केणी यांना निष्ठावान शिवसैनिकानी त्यांनी आधी केलेल्या वक्तव्या बद्द्ल जाहीर माफी मागायला लावली होती याचा विसर केणी यांना पडला का असा सवाल त्यांनी विचारला आहे दत्ता सामंत हे गेली अनेक वर्ष समाजकारण करून राजकारण करत आहेत. नारायण राणेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून गोरगरीब जनतेला मदत कार्य करणे यात त्यांचे सातत्य आहे. आता कोरोना काळातही ऑक्सिजन पुरवठ्यासह अन्य औषधोपचार व मदतकार्य हे सातत्याने करत आहेत. त्यामुळेच जनतेतून दत्ता सामंत यांच्याबद्दल वाढत जाणारी लोकप्रियता पाहता पायाखालील वाळू सरकल्याने आमदार व त्यांचे कार्यकर्ते सैरभैर होऊन टीका करण्याचे काम करत आहेत. मात्र, जनतेला सत्यता माहीत असून कोण काम करतो आहे आणि कोण राजकारण करतो हे जनता पुरती ओळखून चुकली आहे. तेव्हा यापुढे दत्ता सामंत यांच्याबद्दल टीका टिपणी केल्यास जसेच्या तसे उत्तर दिले जाईल असा सूचक इशारा सुनील घाडीगांवकर यांनी देत दत्ता सामंत हे शिवसेनेत यावेत यासाठी शिवसेनेचे नेते मंडळी दत्ता सामंत यांच्याशी संपर्क करून विनवण्या करीत होते. मात्र नारायण राणे यांच्याशी श्री सामंत हे निष्ठावान असल्याने शिवसेनेच्या नेते मंडळींना भीक घालत नसल्यानेच केवळ बदनामी करण्याच्या हेतूने शिवसेनेच्या चिल्लर गँगची कोल्हेकुई सुरू असल्याचा टोला सुनील घाडीगांवकर यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page