बांदा शहर विकास आघाडीचे निवेदन; ५० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह, तातडीने स्वच्छता करण्याची मागणी..
⚡बांदा ता.०९-: बांदा येथील सार्वजनिक स्मशानभूमी परिसरात गोबरधन प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र व संवेदनशील ठिकाणी निर्माण झालेल्या या परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कचरा तात्काळ हटवून परिसर स्वच्छ करण्याबरोबरच सुमारे ५० लाख रुपये खर्च करण्यात आलेल्या गोबरधन प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी बांदा शहर विकास आघाडीने केली आहे. याबाबतचे निवेदन शहर विकास आघाडीच्यावतीने सरपंच प्रियांका नाईक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, स्मशानभूमी परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील दुर्गंधीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून स्मशानभूमीचे पावित्र्यही बाधित होत आहे. त्यामुळे तातडीने संपूर्ण परिसर स्वच्छ करून नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात अग्रस्थानी मानला जात असताना बांदा ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढिगारे दिसून येत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ४ जून रोजी जिल्हाभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. मात्र या अभियानानंतरही बांदा परिसरातील परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, बांदा ग्रामपंचायतीने सुमारे ५० लाख रुपये खर्च करून गोबरधन प्रकल्प उभारल्याचे सांगितले जाते. मात्र एवढा निधी खर्च होऊनही गावातील कचरा व्यवस्थापनाची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे चित्र दिसत आहे. स्मशानभूमीसह विविध सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आढळत असल्याने प्रकल्पाच्या नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी मंजूर झालेला निधी, प्रत्यक्ष खर्च, कामाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि अपेक्षित परिणाम यांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, अनियमितता अथवा आर्थिक गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सार्वजनिक निधी खर्च होऊनही गावात अस्वच्छतेची समस्या कायम असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा बांदा शहर विकास आघाडीने दिला आहे.
या मागणीला बांदा शहर विकास आघाडीचे ओंकार नाडकर्णी, सुशांत पांगम, वासुदेव भोगले, संदेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, राजदीप पावसकर, ज्ञानेश्वर येडवे, विशू पावसकर तसेच पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या रास्त मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच नाईक यांनी तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
