जिल्हा परिषद बांधकाम विभागात बनावट स्वाक्षरी प्रकरण उघड…

१७ लाखांच्या बिलांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न; ठेकेदारावर जबाबदारी निश्चित, कार्यकारी अभियंता रुजू झाल्यानंतर गुन्हा दाखल करणार; प्रमोद कामत..

⚡ओरोस ता ९-: बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून १७ लाख १९ हजार रुपयांची विकासकामांची बिले आणि अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न झाला. एकूण १३ बिले होती. त्यातील एक नियमित बिल होते. तर बारा अनामत रक्कम परत मिळण्याचे बिल होते. यातील ६ लाख ७६ हजार ५८८ रुपयांचे नियमित बिल काढण्यात आले असून अनामत रक्कमेची बिले थांबवून ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणी चौकशी करण्यात आली असून एका ठेकेदारावर खोट्या स्वाक्षरीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सध्या संबंधित कार्यकारी अभियंता सुट्टीवर गेले आहेत. ते हजर झाल्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यानंतर अजून कोण असल्यास त्याचीही पोलखोल होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात अनेक कामांची बिले काढल्याची बातमी मंगळवारी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे आज दिवसभर जिल्हा परिषदेत याबाबत चर्चा सुरू होती. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी याची गंभीर दखल घेतली. सायंकाळी अध्यक्ष श्री कामत यांनी यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष तुकाराम साईल, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ उपस्थित होते. यावेळी या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

You cannot copy content of this page