मोरी जाम; नगरसेवकांच लक्ष वेधून देखील दुर्लक्ष, सुरेश भोगटेंचा आरोप..
⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी शहरात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात अनेक ठिकाणी गटारे तुंबून रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील वैश्यवाडा येथील जुन्या पोस्ट ऑफिससमोरील वर्षानुवर्षे सुरळीत असलेली मोरी अचानक जाम झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. अशी माहिती माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी दिली.
श्री भोगटे म्हणाले, शहरात पाण्याची लाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामावेळी जेसीबीच्या साहाय्याने चुकीच्या पद्धतीने काम करण्यात आले. यामुळे अनेक छोट्या-मोठ्या मोऱ्या आणि नाले कोसळल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित काम सुरू असताना नगरपालिकेचे अधिकारी, ठेकेदार, नगराध्यक्ष, सभापती तसेच नगरसेवक यांना याची कल्पना देण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज शहरात ठिकठिकाणी गटारे आणि नाले तुंबून पाणी रस्त्यावर साचत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर खोदकामानंतर मारण्यात आलेले चर अद्यापही धोकादायक अवस्थेत असल्याने भविष्यात वाहन अडकणे तसेच अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीस जबाबदार कोण? असा सवाल ही श्री भोगटे यांनी उपस्थित केला आहे.
