घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा वर्गीकरण 4 प्रकारात करावे …

श्री. दिलीप गिरप ; वेंगुर्ला न.प. मार्फत 21 जून रोजी जागतिक योग दिन व्यापक स्तरावर..

⚡वेंगुर्ला ता.०९-: घनकचरा अधिनियम 2026 अंतर्गत कचऱ्याचे 4 प्रकारात वर्गीकरण करण्याचे शासनाचे नवीन निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी 2 ऐवजी 4 प्रकारात कचरा वर्गिकरण करून द्यावे. याबाबत नगरपरिषद मार्फत, विविध संस्थामार्फत, नागरिकांमार्फत तसेच घंटागाड्याद्वारे नियोजन करण्यात येणार आहे.नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे वेंगुर्ला शहर व नगरपरिषद स्वच्छतेत आज देशभरात आघाडीवर पोहचले आहे. यापुढेही नागरिकांनी या नवीन शासन आदेशाचे पालन करून वेंगुर्ला शहर अधिक स्वच्छ सुंदर होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी आज मंगळवारी (9 जून )
वेंगुर्ला नगरपरिषद स्वामी विवेकानंद सभागृह येथे आयोजित बैठकीत केले. 21 जून रोजी वेंगुर्ला कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे “जागतिक योग दिन” साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, नागरिक यांना एकत्रित करून हा कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात येत असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष विनायक उर्फ सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती गौरी माईणकर, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती सचिन शेट्ये, समाजकल्याण समिती सभापती युवराज जाधव, महिला व बालकल्याण समिती उपसभापती रिया केरकर, वसुधा योगाच्या संचालिका डॉ. वसुधा मोरे, समन्वयक पूर्वा मसुरकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग योग प्रसार संस्था व वेंगुर्ला नगरपरिषद यांच्यामार्फत 21 जून रोजी जागतिक योग दिन बाबत डॉ. वसुधा मोरे यांनी माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापन
कचरा वर्गीकरण बाबत गणेश कांबळी यांनी माहिती दिली. यावेळी उपस्थित नगरसेवक,नागरिकांनी विविध सूचना मांडल्या. सुरुवातीस नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन गणेश कांबळी यांनी केले. या बैठकीस बांधकाम समिती सभापती प्रणव वायंगणकर, महिला व बालकल्याण समिती सभापती गौरी मराठे,
नगरसेवक दाजी परब, रवींद्र शिरसाट, सदानंद गिरप, प्रशांत आपटे, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, नगरसेविका काजल कुबल, लीना म्हापणकर, समिधा रेडकर, आकांक्षा परब, ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, शितल आंगचेकर, डॉ. धनश्री पाटील, माझा वेंगुर्ला चे सेक्रेटरी राजन गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष स्वप्निल रावळ, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश परुळेकर, यासिर मकानदार, सागर चौधरी, तसेच अधिकारी कर्मचारी, नागरिक व्यापारी, विविध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page