नागरिकांचा सवाल ; ग्रामीण भागासाठी दूरध्वनी सेवा बंदचे कारण काय..
⚡वेंगुर्ला ता.०८-: सध्या पूर्ण क्षमतेने मान्सून सुरु होण्यापूर्वीच वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात वीज पुरवठा ट्रिप करण्यात येत असल्याने सर्वसामान्य जनतेतून एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. वेंगुर्ला वीज वितरण कार्यालयाने शहर विभागासाठी टेलिफोन सुविधा सुरु ठेवली आहे. तर ग्रामीण भागासाठी दूरध्वनी सेवा बंद का? असा सवाल ग्रामीण जनतेतून उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागाने ग्रामीण भागातील लाईनमनशी संपर्क साधण्यात यावा, असे सांगितले आहे. तर या तालुका कार्यालयाचे इनचार्ज असलेले चंद्रशेखर पेटकर हे मोबाईल रिसिव्हच करीत नसल्याने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. वेंगुर्ला सभापती शंकर घारे यांनी तक्रार निवारण साठी ” पावसाळा कालावधीत मुख्य ऑफिसमध्ये एक व्यक्ती नेमण्याचे” आदेश दिला असून याबाबत कार्यवाही झाली का? असा सवाल ग्रामीण जनतेतून व्यक्त करण्यात आला आहे. अन्य शासकीय कार्यालय जबाबदार अधिकाऱ्यांनी दूरध्वनी सेवा पूर्ववत सुरु केली असून वीज वितरण याबाबत “अलग भूमिका” का घेत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. ऐन पावसाळ्यात धोकादायक स्थितीत “पोलवर काम करणाऱ्या वायरमनशी संपर्क साधावा” कि संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असा सवाल युवा वर्गातून उपस्थित करण्यात आला आहे.वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष यांचे याबाबत घुमजाव अथवा दुर्लक्ष का, असा सवाल ग्रामीण जनतेतून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी ग्रामीण जनतेच्या सुविधेसाठी दूरध्वनी सेवा सुरु करण्याबाबत लक्ष पुरवावे, अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात आली आहे. वीज पुरवठा ट्रिप चा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत असून 15 जून पासून शालेय हंगाम सुरु होणार आहे.
