आपत्ती काळात सर्व विभागांनी नागरिकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे…

मालवण तालुका आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सूचना..

⚡मालवण ता.०८-:
पावसाळ्याच्या कालावधीत मालवण तालुक्यात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींवर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून एकत्रितपणे काम करावे, सर्व विभागांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना मालवण तहसील कार्यालयात पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत देण्यात आल्या.

मालवण तालुक्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करता यावा तसेच यापूर्वी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी संबंधित विभागांकडून योग्य प्रकारे करण्यात आली आहे का, याची पडताळणी करण्याच्या उद्देशाने तालुका आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक तहसील कार्यालय, मालवण येथे निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विभागांच्या आपत्तीपूर्व तयारीचा, उपलब्ध संसाधनांचा तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार जांभेकर यांनी मागील बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी कितपत झाली आहे, याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ज्या सूचनांची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे, त्याबाबत समाधान व्यक्त करताना उर्वरित बाबी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पूरप्रवण क्षेत्रे, दरडग्रस्त भाग, समुद्रकिनारी असलेली गावे, तसेच आपत्तीचा धोका असलेल्या संवेदनशील ठिकाणांबाबत विशेष चर्चा करण्यात आली. अशा भागांमध्ये सतत देखरेख ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार नागरिकांना वेळेवर सूचना देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. आपत्तीच्या प्रसंगी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्वरित प्रतिसाद देणे ही प्रत्येक विभागाची जबाबदारी असल्याचे जांभेकर यांनी स्पष्ट केले.

बैठकीत वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पोलीस, नगरपरिषद, ग्रामपंचायत, जलसंपदा, महसूल, शिक्षण तसेच इतर संबंधित विभागांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री, वाहने, वैद्यकीय सुविधा, औषधसाठा आणि संपर्क यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत सर्व विभागांना निर्देश देण्यात आले. तसेच कोणत्याही आपत्तीच्या घटनेवेळी विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखून नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांची कार्यक्षमता, संपर्क क्रमांकांची उपलब्धता, आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या साधनसामग्रीची स्थिती आणि बचाव पथकांची तयारी याबाबतही सविस्तर चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या तयारीबाबत माहिती देताना सर्व यंत्रणा सतर्क असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने कार्यवाही करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

निवासी नायब तहसीलदार जांभेकर यांनी यावेळी सर्व विभागांना आपत्ती काळात अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीनुसारच कार्यवाही करावी, तसेच स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे सांगितले. सर्व विभागांनी आपत्तीपूर्व तयारी अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page