१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त..
⚡मालवण ता.०८-:
मालवण नगरपालिका आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या वतीने सोमवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधून शहरात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम राबवण्यात आली. आरोग्य पथकाने सोमवार पेठ आणि देऊळवाडा येथील दुकानांवर अचानक छापे टाकले. या कारवाईमुळे संबंधितात एकच खळबळ उडाली. या कारवाईत तब्बल १५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित व्यापाऱ्यांवर ६ हजार ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातलेली असतानाही अनेक दुकानांमध्ये प्लास्टिकचा वापर होत असल्याची माहिती नगरपालिकेला मिळाली होती. त्यानुसार आज आठवडा बाजाराच्या दिवशी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे प्लास्टिकचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नगरपालिकेच्या या धडक कारवाईत स्वच्छता निरीक्षक संजय पवार, स्वच्छता लिपिक मंदार केळुसकर, मुकादम आनंद वळंजू, विजतांत्री सुनिलकुमार कदम यासोबतच पालिकेचे इतर सफाई कर्मचारीही सामील झाले होते.
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा, अन्यथा यापुढेही अशीच तीव्र दंडात्मक कारवाई सुरू राहील, असा इशारा नगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
