मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे आयोजन..
⚡कुडाळ ता.०८-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तेंडोली गावात रावे उपक्रमांतर्गत इकोब्रिक्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत भार्गवी मनोज प्रभूतेंडोलकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय तनिष्का विश्वनाथ प्रभू व तृतीय यशस्वी मधुकर मेस्त्री यांनी मिळविला. स्पर्धेत एकूण १०० इकोब्रिक्स गोळा करण्यात आल्या.
तेंडोली सरपंच ऍड. अनघा तेंडोलकर, उपसरपंच आकाश मुणनकर,पं. स. समिती सदस्य मंगेश प्रभू, ग्रामसेविका सुनीता कदम, विजय प्रभू, राजू राऊळ, प्रगतशील शेतकरी अच्युत पोतकर, अन्य पदाधिकारी तसेच उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप गुरव, डॉ. गिरीश उईके व डॉ. राजेश राठोड उपस्थित होते.
इकोब्रिक्स स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण दिनाचे प्रतीक म्हणून काजूचे रोप देण्यात आले. अनघा तेंडोलकर यांनी पर्यावरण स्वच्छतेचे महत्व आणि जनजागृती यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थीनी नेहा प्रभूतेंडोलकर हिने प्लास्टिकचे दुष्परिणाम, इकोब्रिक्स चे महत्व व हवामान बदल यावर बोलताना तेंडोली गाव प्लास्टिक मुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन केले. त्यानंतर उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप गुरव यांनी गावातील लोकांना शाश्वत शेती व पर्यावरण जपणूक यावर मार्गदर्शन केले. कॉलेज व कॉलेजच्या रावे या उपक्रमाची माहिती दिली. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आंब्याच्या झाडाची लागवड करून गावात पर्यावरण रक्षणाचा पायंडा घातला गेला, असे त्यांनी सांगितले.
