साक्षी वंजारी: नगरपरिषदेचा कारभार राजवाड्यातूनच चाललाय असल्याचा ही केला आरोप..
⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी नगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांना नगराध्यक्ष आपले सफाई कर्मचारी समजतात का ? जर हा कार्यक्रम भाजपचा होता तर त्याची कुठे ही प्रसिद्धी का नाही दिसत ? साफसफाईच करायची होती तर सार्वजनिक जागांची का नाही केली ? खाजगी मालमत्ते साफसफाई मोहीम राबवण्याचा अधिकार नेमका कोणत्या निकषांवर वापरला ? राजवाड्यातील कर्मचारी सुट्टीवर गेले होते का ? असे सवाल कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केले आहेत.
तसेच हे करण्यापेक्षा सत्ताधारी नगरसेवकांनी शहरात फिरून नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असाही टोला त्यांनी लगावला आहे
सौ. वंजारी म्हणाल्या, राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सावंतवाडी येथील राजवाडा परिसराची साफसफाई नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, लखमराजे भोसले यांच्या पुढाकाराने तसेच भाजपमधील काही निवडक नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. पण, साफसफाईच करायची होती तर सावंतवाडी शहरात नरेंद्र डोंगर परिसर, जगन्नाथराव भोसले उद्यान, जिमखाना परिसर, मोती तलावाचा काठ, तळ्यातं साठलेली प्रचंड प्लास्टिक बॉटल्स ज्यांच्या अनेक बातम्या काही दिवसापूर्वी येऊन गेल्या अशा अनेक सार्वजनिक ठिकाणांची निवड करता आली असती. मात्र, यासाठी राजवाडा परिसराचीच निवड का करण्यात आली ? विशेष म्हणजे जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारची साफसफाई मोहिम भाजपच्यावतीने झाल्याचे ऐकण्यात नाही. त्यामुळे नगराध्यक्षा यांनी पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना घेऊन खाजगी मालमत्तेच्या परिसरात साफसफाई मोहीम राबवण्याचा अधिकार नेमका कोणत्या निकषांवर वापरला ? असा सवाल त्यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, सावंतवाडीतील नगरसेवक आणि नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी राजवाड्याचे उंबरठे झिजवावे लागतील किंबहुना नगरपरिषदेचा कारभार राजवाड्यातूनच चालेल असं मी निवडणूकीत म्हटलं होतं. निवडणुकी नंतर बऱ्याच मीटिंग राजवाड्यात झाल्याची चर्चा सुद्धा गांधी चौक व्यापारी वर्गात होती. कालच्या घटनेनंतर त्या विधानाची सुरुवात झाल्याचे दिसून येते. आज सावंतवाडी शहर अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. उघडी गटारे, खड्डेमय रस्ते, भटके कुत्रे व जनावरांचा मुक्त संचार, पाईपलाईनच्या कामांतील त्रुटी अशा अनेक मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यावरून नगरपरिषदेचा कारभार नियोजनशून्य असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.
त्यामुळे नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी शहरातील विविध भागात फिरून नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. सध्या नागरिकांमध्ये ‘यापेक्षा प्रशासकीय कारभार अधिक चांगला होता’ अशी भावना व्यक्त होत असल्याचे ऐकायला मिळत आहे. एवढच नाही तर शिवसेनेचे नगरसेवक बाबू कुरतडकर यांचा सोशल मीडिया स्टेटस दोन दिवस सावंतवाडी शहरात चर्चेचा विषय बनला होता. “नगरसेवकांची राजवाड्यात खरी कमायी ” असा टोला त्यांनी हाणला होता. आता महायुतीचे नगरसेवक सुद्धा उघडपणे बोलत असून पालकमंत्र्यानी यावर वेळीच लक्ष द्यावे. नाहीतर विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसला जनतेसंह रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी दिला आहे.
