सावंतवाडी एस.टी. बसस्थानक परिसरातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत असून ती तात्काळ दुरुस्त करा…

नगरसेवक आनंद नेवगी व मोहिनी मडगावकर यांची मागणी: धोकादायक झाड तोडण्याची देखील केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी एस.टी. बसस्थानक परिसरातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत असून ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, तसेच परिसरातील धोकादायक झाड तोडण्यात यावे, अशी मागणी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक आनंद नेवगी व नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी आगार व्यवस्थापकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानक आवारातील चितारआळी येथून वैशवाडा जाणाऱ्या रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळण्याच्या अवस्थेत असून पावसाळ्यात ती रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित भिंतीलगत असलेले मोठे झाडही धोकादायक बनले असून ते परिसरातील घरांवर कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत आगार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. भविष्यात या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही नगरसेवक नेवगी व नगरसेविका मडगावकर यांनी दिला आहे.

यावेळी निवेदन देताना राघू चितारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page