रस्त्याची गटारे झालीत चक्क कचराकुंडी…

आजगाव, मळेवाड, कोंडुरे, सातार्डा,आरोंदा रस्त्याच्या गटारात कचराचे साम्राज्य..

⚡सावंतवाडी ता.०८-: शासन एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून जनतेला स्वच्छतेचे धडे देत आहे, तर दुसरीकडे मात्र काही लोकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे सार्वजनिक व्यवस्था धोक्यात आली आहे.
आजगाव , मळेवाड कोंडुरे सातार्डा,आरोंदा या रस्त्यांच्या बाजूची गटारे आता चक्क ‘सार्वजनिक कचरा कुंड्या’ बनल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.
कोणतीही भीती किंवा लाज न बाळगता सर्रासपणे काही लोक आपला घरगुती आणि व्यावसायिक कचरा थेट गटारात फेकत आहेत.

काही लोक आळसामुळे किंवा निष्काळजीपणामुळे कचरा थेट नदी नाल्यात,रस्त्याच्या गटारात टाकत आहेत. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, शिळे अन्न, काचेच्या, प्लास्टिक बाटल्या,कपडे,आणि इतर टाकाऊ वस्तूंचा समावेश आहे. परिणामी, कचरा अडकून गटारे तुंबत आहेत आणि घाण पाणी रस्त्यावर पसरत आहे.तसेच ह्या टाकाऊ वस्तू गुरे खात असल्याने त्याचा परिणाम या मुख्या प्राण्यांना भोगावा लागत आहे.
दिवसेंदिवस गटारांमधील कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळा तोंडावर असताना अशी परिस्थिती राहिल्यास डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोसारख्या घातक आजारांची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानाला’ अशा काही बेजबाबदार लोकांमुळे हरताळ फासला जात आहे. प्रशासनाने केवळ उपदेश न देता आता अशा लोकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांमधून होत आहे. जोपर्यंत कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही असे दिसते.
आजगाव ग्रामपंचायत ने घेतली दाखल.
आजगाव ते मळेवाड या रस्त्याच्या गटारात राजरोस पणे कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असताना,ह्या गंभीर घटनेची दखल घेत आजगाव ग्रामपंचायत वतीने आजगाव परिसर रस्ता गटारात हा टाकलेला कचरा एकत्रित गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती.त्याच प्रमाणे या रस्त्यावर काही भागात , मार्गदर्शक सूचना फलक लावून स्वच्छतेबाबत जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही दिवसांनी परत या ठिकाणी काही लोकांकडून कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून अशा लोकांकडून ही गटारे,विद्रूप करण्याचे प्रकार वाढले आहेत.त्यामुळे अशा लोकांना शासन होणे तेवढेच गरजचे आहे.

You cannot copy content of this page