सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस पाटलांची आर्थिक कोंडी…

तीन महिन्यांचे मानधन रखडले:- मानधन तत्काळ मिळण्याची केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.०८-: गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाचा दुवा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे गेल्या तीन महिन्यांचे मानधन रखडल्यामुळे पोलीस पाटील आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
मागील मार्च,एप्रिल, मे महिन्याचे मानधन वेळेवर न मिळाल्याने पोलीस पाटलांवर सध्या उपासमारीची वेळ आली असून त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने तातडीने हे मानधन बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे पोलीस पाटलांना घरखर्च, मुलांचे शिक्षण,मुलांचे शैक्षणिक प्रवेश आणि वैद्यकीय खर्च, वाढती महागाई यामुळे खर्च भागविणे कठीण झाले आहे.
सध्या पोलीस पाटील यांच्या वाढलेल्या कामाच्या तुलनेत त्यांचे मानधन रखडल्याने नाराजी पसरली आहे.
शासकीय बैठका, गावात फिरणे आणि पोलीसांना माहिती पुरवण्यासाठी लागणारा पेट्रोलचा खर्च पोलीस पाटलांना स्वतःच्या खिशातून करावा लागत असल्यामुळे त्यांच्यावर खर्चाचा आर्थिक बोजा पडत असून, ते मोठ्या संकटात सापडले आहेत.
पोलीस पाटील हा गृह विभाग व महसूल विभागाचा ग्रामीण स्तरावरील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. गावातील तंटे मिटविणे, गुन्ह्यांची माहिती देणे आणि सलोखा राखणे ही कामे ते चोख बजावतात. असे असूनही त्यांचे मानधन थकित झाल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
त्यामुळे रखडलेले मानधन लवकरात मिळावे, अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page