वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्ग आजही समस्याग्रस्त…

मार्गांवर झाडे पडल्यास दरवर्षी होते श्री सोमेश्वर मंदिरमार्गे वाहतूक..

⚡वेंगुर्ला ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मठमार्गे कुडाळ तसेच वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी हा महत्त्वाचा मार्ग आहे. पावसाळा हंगाम सुरू होत असून संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष पुरविणार का? असा सवाल वाहनधारकातून करण्यात आला आहे.
या महत्त्वाच्या मार्गावर वेंगुर्ला हॉस्पिटल नाका वेंगुर्ला भटवाडी – मठ गावातील कार्यक्षेत्र -आडेली कामळेवीर भागातील कार्यक्षेत्र ते आकेरी पर्यंत हा महत्त्वाचा मार्ग आहे. मोठ्या पावसाळ्यात वादळी वाऱ्यात येथे मुख्य रस्त्यावर धोकादायक झाडे वादळी वाऱ्याने अथवा उनमळून पडण्याच्या घटना गेली दहा वर्षे येथील सर्वसामान्य जनता अनुभवत आहे. त्यामुळे या मार्गावर झाडे पडल्यास वाहतूक आडेली श्री देव सोमेश्वर मंदिर मार्गे व मठ श्री देव स्वयंभू मंदिर नजीक मार्गे वळविण्यात येते. हे दोन्ही अंतर्गत मार्ग अरुंद असल्याने स्थानिक नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना याचा धोका संभवतो. दरवर्षी “ये रे माझ्या मागल्या” प्रमाणे शासनाच्या व संबंधित विभागाच्या पूर्णतः लक्ष न देण्याच्या वृत्तीमुळे गोरगरीब जनता, नोकरदार वर्ग वेठीस धरला जातो.वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी लक्षपूर्वक नगरपरिषद कार्यक्षेत्रातील मुख्य रस्ता झाडी कटिंग काम करण्यात आले आहे. तसेच वेंगुर्ला सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभाग मार्फत थोडेफार मेंटेनन्सचे काम करण्यात आले आहे. परंतु मुख्य मार्ग असल्याने नोकरदार वर्ग, व्यावसायिक तसेच ,कॉलेज युवती – युवक व अन्य यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने संबंधित विभागाने या मार्गाची तातडीने पाहणी करून नागरिकांची होणारी गैरसोय, होणारा वेळेचा अपव्यय तसेच होणारे शासकीय नुकसान टाळण्यासाठी वेळीच अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य जनता व वाहनधारक यांच्यातून करण्यात आली आहे. या मुख्यमार्गानजिक जीर्ण वृक्ष अगदी रस्त्याला लोबकळत आहेत तसेच रस्ता दुतर्फा गतवर्षीची झाडी, आकेशियाचे खोड रस्ता लगत पडून आहेत. सध्या नागरिकांना गॅस दरवाढीचा फटका बसत आहे त्यामुळे शासनास या पडलेल्या झाडांची आवश्यकता नसल्यास गोरगरीब जनतेला हा लाकूडफाटा देण्यात यावा, असा सूर व्यक्त होत आहे. संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सरपंचांच्या मागणीकडे दुर्लक्ष व चालढकलपणा केले जात असल्याने वेंगुर्ला सभापती शंकर घारे तसेच स्थानिक जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, स्थानिक पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी तातडीने पाहणी करून संबंधित समस्या दूर कराव्यात, अशी आग्रही मागणी जनतेतून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page