माजी आमदार वैभव नाईक यांचा थेट आरोप..
⚡कुडाळ ता.०७-: झाराप रेल्वे स्थानकावरून सध्या सुरू असलेल्या खनिज वाहतुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंगचा साठा आणि वाहतूक हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून, हा संपूर्ण काळाबाजार ‘मायनिंग माफिया’ कडून चालवला जात असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी रेल्वे प्रशासन आणि महसूल विभागाच्या भूमिकेवरही तीव्र संशय व्यक्त केला आहे.
या संदर्भात बोलताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की, झाराप स्थानकावर आणले जाणारे हे खनिज अधिकृत मार्गाने आलेले नाही. ‘आडाळी एमआयडीसी’च्या परिसरातून आणलेले हे खनिज असून, या मोठ्या बेकायदेशीर व्यवसायामध्ये सर्वपक्षीय लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत त्यांनी सांगितले की, झाराप स्टेशनवरून होणाऱ्या या खनिज वाहतुकीसाठी आवश्यक असणारे कोणतेही वैध ‘पास’ किंवा महसूल विभागाचे परवाने उपलब्ध नाहीत.
विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, सरकारची मोठी फसवणूक आणि लूट सुरू आहे. मात्र, इतका मोठा प्रकार डोळ्यांसमोर घडत असतानाही रेल्वे प्रशासन आणि स्थानिक महसूल विभाग याकडे पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ‘मायनिंग माफिया’ला कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
“हा सर्व माल आडाळी एमआयडीसीमधील उत्खननातून चोरलेला असल्याने या बेकायदेशीर साखळीमागे नेमके कोणते मुख्य सूत्रधार आहेत, याचा शोध प्रशासनाने तातडीने घेतला पाहिजे. तसेच दोषींवर कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.
या संपूर्ण गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी आपण स्वतः महसूल विभाग आणि रेल्वे प्रशासनाकडे पुराव्यांसह रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी महसूल आणि रेल्वे प्रशासन काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
