भाजपा हळूहळू शिंदेसेनेला बाजूला करणार – वैभव नाईक..
⚡कणकवली ता.०७-: माजी आमदार वैभव नाईक यांनी आ. निलेश राणे यांच्यावर टीका करताना भविष्यात ते भाजपमध्येच जातील, असा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंधांवरही भाष्य केले. वैभव नाईक म्हणाले, खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला जवळून ओळखतात. त्यांनी मला काय सांगितलं हे त्यांनाच माहिती आहे. त्यावेळी ते शिवसेनेचे नेते होते आणि आजही माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. मात्र पक्षाची भूमिका ही माझी ठाम भूमिका आहे आणि ती मी कायम ठेवणार आहे.
ते पुढे म्हणाले, भाजप हळूहळू शिवसेना (शिंदे गट) ला बाजूला काढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. निलेश राणे यांचे वडील नारायण राणे भाजपमध्ये आहेत, तर त्यांचे बंधू नितेश राणे हे भाजपचे आमदार व सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे भविष्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या, तर निलेश राणे हे एकनाथ शिंदेंसोबत राहणार नाहीत, हे शंभर टक्के खरे आहे.
नाईक यांनी पुढे म्हटले, माझी परीक्षा होती तेव्हा मी ती दिली. आता निलेश राणेंची परीक्षा आहे. ते कोणत्या सत्ताधारी पक्षात जाणार ? भाजपमध्ये जाणार की नाही ? हे येणारा काळ ठरवेल. मात्र मला खात्री आहे की ते आपल्या वडिलांच्या पक्षात म्हणजे भाजपमध्येच जातील.
त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
