कणकवली बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई होणार…

कणकवली : परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, मुंबई यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग विभागात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत कणकवली बसस्थानकाच्या २०० मीटर परिघातील खाजगी प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित चालकांना सूचना देण्यात आल्या.

कणकवली बसस्थानक परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहासीटर, रिक्षा व ट्रॅव्हलर चालकांना बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली एकत्रित करण्यात आले. यावेळी त्यांना महामंडळाच्या २०० मीटर परिघाबाहेरूनच प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बसस्थानकाच्या २०० मीटर परिघात प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

या मोहिमेदरम्यान सिंधुदुर्ग विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी महेंद्र शिवाजीराव टापरे, कणकवली आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, राखण व पहारा निरीक्षक सतीश तिवडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीनिवास कदम, वाहतूक नियंत्रक श्री तांबे, श्री. चव्हाण, श्री. पावसकर, सुरक्षा रक्षक अर्जुन कांबळे तसेच कणकवली आगारातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

महामंडळाचे उत्पन्न वाढविणे, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आणि प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती सुरक्षा व दक्षता अधिकारी महेंद्र शिवाजीराव टापरे यांनी दिली. त्यांनी सर्व खाजगी वाहतूक चालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page