⚡बांदा ता.०६-: छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक हे केवळ एका राजाचे सिंहासनारोहण नव्हते, तर स्वाभिमान, स्वराज्य आणि जनकल्याणकारी शासनव्यवस्थेचा विजय होता. शिवरायांनी सर्वसामान्यांच्या मनात स्वत्वाची जाणीव निर्माण केली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा जपत राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी येथे केले.
बांदा येथील नट वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. पाटील बोलत होते. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, संचालक जगन्नाथ सातोस्कर, शंकर नार्वेकर, संचालिका सौ स्वप्नीता सावंत, माजी सचिव गुरुनाथ नार्वेकर, अनंत भाटे, स्वराज्य प्रतिष्ठानचे भूषण सावंत, संकेत वेंगुर्लेकर, प्रवीण परब, तनिष मेस्त्री, सौ नेत्रा राणे, डॉ. केदार, नैतिक मोरजकर, वाचनालयाचे कर्मचारी सुनील नातू, ओंकार राऊळ, अमिता परब आदी उपस्थित होते. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून शिवरायांच्या कार्याचा ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून उहापोह केला. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेले संघर्ष, लोकाभिमुख प्रशासन, धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन आणि दूरदर्शी नेतृत्व याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अनंत भाटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना सुराज्य म्हणजेच जनतेचे राज्य निर्माण करायचे होते. यासाठीच त्यांनी तत्कालीन परिस्थितीत अनेकांचा विरोध झुगारून देत राज्याभिषेक करवून घेतला. यामुळेच जनतेला आपले हक्काचे राज्य मिळाले.
या कार्यक्रमास वाचनालयाचे वाचक तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रा. पाटील यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नातू यांनी केले. नीलेश मोरजकर यांनी आभार मानले.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर व शिवप्रेमी नागरिक.
