अचानक झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ..
⚡सावंतवाडी ता.०६-: आरोंदा येथील आज आठवडा बाजारात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने व्यापारांसह ग्राहकांचीही धावपळ उडाली.
कालपासून मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे लोक मॉन्सूनपूर्व कामे करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
तर काही ठिकाणी आठवडा बाजारपेठेत गावठी वस्तू, स्थानिक व बाहेरील व्यापारी आपला माल विकण्यासाठी येत आहेत.
आज आरोंदा येथील आठवडा बाजारात लहान मोठ्या व्यापारांसह ग्राहकांचीही धावपळ उडाली.अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या विकण्यासाठी आणलेल्या वस्तू या पावसाच्या पाण्यात भिजू नये म्हणून प्लास्टिक घालून त्या सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत होते.तर या पावसामुळे ग्राहकांची धावपळ उडत होती.तर पावसापासून बचाव करण्यासाठी काही ग्राहक जिथे मिळेल तिथे आश्रय घेताना दिसत होते.
या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते चिखलमय झाले होते,त्यातून वाट काढताना पादचाऱ्यांना,वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.यामुळे रस्त्याच्या गटारांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोंदा बाजारपेठेत भरलेला मिरगाचा बाजार (आठवडा बाजार) हा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कोकणात मान्सून सुरू होण्यापूर्वी लोक वर्षभरासाठी किंवा पावसाळ्याच्या ४ महिन्यांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी या बाजारात गोवा व आरोंदा दशक्रोशीतील लोक मोठी गर्दी करतात.
कोकणात मुसळधार पाऊस पडत असल्याने पावसाच्या सुरुवातीला भरणारे आठवडा बाजार हे स्थानिक लोकांसाठी खरेदीचे मुख्य केंद्र असतात.गावठी आणि पारंपरिक वस्तू या बाजारात पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तू, कडधान्य,सुके मासे , सुकामेवा, आंबे,फणसाचे पदार्थ, चिंच, मसाले आणि ताडपत्री (प्लास्टिक) यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
स्थानिक शेतकरी घरगुती व गावठी वस्तू विकण्यासाठी तसेच आजूबाजूच्या गावांतील छोटे व्यापारी आणि शेतकरी येथे येत असतात.
मात्र आज आरोंदा येथे अचानक आलेल्या पावसामुळे उडालेला गोंधळामुळे आपल्या मालाचे नुकसान टाळण्यासाठी हे व्यापारी, दुकानदार कसरत करत होते.
अनेक व्यापारी उघड्यावर किंवा तात्पुरत्या शेडमध्ये आपला माल मांडतात. मात्र पाऊस सुरू होताच सुके मासे, मिरची, मसाले आणि धान्य ,फळे , इतर वस्तू भिजून नुकसान होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांची प्लास्टिक कापड (ताडपत्री) झाकण्यासाठी प्रचंड धावपळ होत होती.
यावेळी बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना अचानक आलेल्या पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुकानांच्या आडोशाचा , हॉटेलचा आसरा घ्यावा लागला.
बाजापेठेत आणि रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते.आरोंदा बाजारपेठेतील रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारांची योग्य सफाई न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले. यामुळे रस्ते चिखलमय झाले असून रस्त्यावरून जाताना पादचाऱ्यांना,वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी गटार स्वच्छता वेगाने करणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांमधून उमटत होती.
