बंद पडणारी जल वाहतूक सुरू करून पालकमंत्री नेमकं काय साधणार.. ?

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल:चिपी’ वरून विमानफेऱ्या वाढविण्याची मागणी..

⚡कुडाळ ता.०६-: मुंबई ते विजयदुर्ग प्रमाणे बंद पडणारी जलवाहतूक सुरू करुन पालकमंत्री नेमकं काय साधणार, असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यापेक्षा पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळ ते गोवा जेटीपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा चिपी विमानतळावर विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी देखील श्री. किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे, पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकीत चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे जाहीर केले. काही दिवसापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठा गाजावाजा करत मुंबई भाऊचा धक्का ते विजयदुर्ग जलसेवा सुरू केली होती. सदर जलसेवेचे उद्घाटन करताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोकण साठी मोठमोठी आश्वासने देखील दिली होती. परंतु सदरची जलवाहतूक केवळ एक दोन फेऱ्यातच ठप्प पडून सध्या मात्र कायमस्वरूपी बंद पडल्याची परिस्थिती आहे. अशातच पुन्हा एकदा पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात बैठक घेत चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा अवाजवी खर्च करून बंद पडणारी जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा तसेच चिपी ते गोवा जलवाहतुकीमुळे इतर राज्यातील व्यावसायिकांना फायदा पोहोचविण्यापेक्षा चिपी विमानतळावरील विमानांच्या फेऱ्या कशा वाढतील यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी शासनातर्फे ठोस उपाययोजना कराव्यात ज्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होईल व इथल्या स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापारात वृद्धी होईल अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page