आडेली आंबेडकरनगर येथील नागरिकांना 3 ते 5 हजार लिटर पाणीपुरवठा करा…

श्री. प्रितेश राऊळ ; नजिकच्या विहिरीचे काम ठेकेदाराने 15 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश.

⚡वेंगुर्ला ता.०६-: तालुक्यातील आडेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आडेली आंबेडकरनगर येथील जुन्या विहिरीत पाण्याचा साठा आटल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी शुक्रवारी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी पाण्याचा अल्प साठा निदर्शनास आला. तसेच याबाबत येथील नागरिकांना पाण्याची समस्या भासू नये यासाठी पावसाळा पूर्ण क्षमतेने सुरु होईपर्यंत येथील नागरिकांना ग्रामपंचायतीने 5 हजार लिटर पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्याचे जि. प. शिक्षण आरोग्य सभापतीनी आडेली ग्रामपंचायतीला आदेश दिले. तसेच नजिकच्या अनियमित काम सुरु असलेल्या सार्वजनिक विहिरीचे काम येत्या 15 दिवसात पूर्ण न केल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी पं. स. सदस्य नितीन मांजरेकर,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सरपंच यशस्वी कोंडसकर,आडेली आंबेडकरनगर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान येथील श्री सोमेश्वर सोसायटीच्या बोअरवेलवरून पाणी देण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा उपअभियंता श्री. शिंदे यांनी दिली.

You cannot copy content of this page