वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या व्यवहारांची ACB कडून चौकशी…

नगरपंचायतकडे माहितीची केलीय मागणी..

⚡कणकवली ता.०६-: माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्ता व्यवहारांबाबत सुरू असलेल्या उघड चौकशीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) रत्नागिरीने कणकवली नगरपंचायतीकडे महत्त्वाची माहिती मागविली आहे. पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रभाग क्रमांक १ मधील इमारत क्रमांक ७ मधील गाळा आणि सीटी सर्व्हे क्रमांक ४३२१ ही मिळकत एकच आहे की स्वतंत्र, याबाबतचा खुलासा मागितला आहे.

ACB कडून पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, वैभव नाईक यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान सादर करण्यात आलेल्या खरेदी-विक्री दस्तऐवजांमध्ये काही विसंगती आढळून आल्याने संबंधित माहितीची पडताळणी करण्यात येत आहे.

दस्तऐवजांनुसार, वैभव नाईक यांनी ४ एप्रिल २००२ रोजी मौजे कणकवली येथील सर्व्हे क्रमांक २२४ अ २ मधील इमारत क्रमांक ७, वॉर्ड क्रमांक १ मधील गाळा (सीटी सर्व्हे क्र. ४३२१, क्षेत्रफळ १६० चौ. फूट) प्रकाश सहदेव वाळके यांच्याकडून एक लाख रुपयांना खरेदी केला होता.

त्यानंतर १२ जानेवारी २००६ रोजी त्यांनी सर्व्हे क्रमांक २२४ ब ३ मधील त्याच वर्णनाचा वाणिज्य गाळा (सीटी सर्व्हे क्र. ४३२१, क्षेत्रफळ १६० चौ. फूट) कलमठ येथील विश्वनाथ पांडुरंग पाटील यांना अडीच लाख रुपयांना विक्री केल्याचे खरेदीखत सादर करण्यात आले आहे.

मात्र, २००२ च्या खरेदीखतात संबंधित गाळा सर्व्हे क्रमांक २२४ अ २ मध्ये असल्याचे नमूद असताना, २००६ च्या विक्रीखतात तोच गाळा सर्व्हे क्रमांक २२४ ब ३ मध्ये दाखविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही व्यवहारांतील सीटी सर्व्हे क्रमांक ४३२१ असलेला गाळा एकच आहे की दोन स्वतंत्र गाळ्यांचा व्यवहार झाला आहे, याबाबत ACB ने स्पष्ट माहिती मागितली आहे.

या संदर्भातील संपूर्ण माहिती आणि उपलब्ध नोंदी सत्वर सादर करण्याचे निर्देश ACB ने कणकवली नगरपंचायतीला दिले आहेत. या चौकशीमुळे संबंधित मालमत्ता व्यवहारांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, नगरपंचायतीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page