भाजपमध्ये खळबळ:कोलगावातील पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप..
⚡सावंतवाडी ता.०६-: येथील पालिकेच्या नगरसेविका तथा भाजपच्या शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने स्थानिक भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने अंतर्गत कुरघोडी केली जात असून पक्ष बैठकीत आपला अपमान करण्यात आल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मडगावकर यांनी पक्षातील काही व्यक्तींवर थेट निशाणा साधला. विशेषतः कोलगावातील एका पदाधिकाऱ्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्ष संघटनेत काम करत असताना सहकार्याऐवजी वारंवार अडथळे निर्माण केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्यासमोरही संबंधित पदाधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत आपण नाराजी व्यक्त केली होती, असे त्यांनी सांगितले. पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसल्यामुळे अखेर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे मडगावकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे सावंतवाडी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
